गंगापूर शहरात घरफोडी करणारे दोन आरोपी पोलिसांच्या ताब्यात

Foto
तीन दिवसांची पोलीस कोठडी

गंगापूर, (प्रतिनिधी) : संतोषी माता गल्ली सखारामपंत नगर भागात एकाच रात्री दोन धाडसी घरफोड्या झाल्याने खळबळ उडाली होती. संतोषी माता गल्ली येथील रहिवासी कदिर खान नशिर खान पठाण यांच्या घराच्या खालच्या मजल्याचे कुलूप तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला. कपाटातील सोन्याच्या ४ बाळ्या, २ टापसे, चांदीचे ब्रेसलेट, चैन, जोडवी आणि २०,००० रुपये रोख असा एकूण ८८, ५०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. 

विशेष म्हणजे चोरट्यांनी घराचे मूळ खरेदीखतही नेले आहे. तसेच बाळू दामोदर कासोदे यांच्या वडिलांच्या बंद घराला चोरट्यांनी लक्ष्य केले. कासोदे यांचे वडील रुग्णालयात उपचार घेत असल्याने घर बंद होते. सकाळी शेजाऱ्याऱ्यांनी दरवाजा उघडा पाहिल्यानंतर ही घटना उघडकीस आली. येथून आयटेल कंपनीचा टीव्ही, गॅस टाकी आणि रोख १, १०० रुपये असा एकूण ९,१०० रुपयांचा माल चोरीला गेला आहे. दोन्ही घरफोड्या बाबत गंगापूर पोलीस स्टेशन येथे गुरुवारी दि २६ रोजी दोन वेगवेगळे गुन्हे दाखल झाले आहेत.

यौपैकी एका घरफोडीचा तपास लावण्यात पोलिसांना मोठे यश आले आहे. गुरुवारी (दि. २६) गुन्हा दाखल होताच, पोलिसांनी चक्रे फिरवून अवघ्या १२ तासांच्या आत दोन सराईत चोरट्यांना बेड्या ठोकल्या आहेत. तांत्रिक माहिती आणि गुप्त बातमीदारांच्या आधारे पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे.

श्रावण गोरखनाथ खाजेकर (वय २१, रा. सखारामपंत नगर, गंगापूर), आकाश कचरू जगधने (वय २५, रा. नेवासा, जि. अहिल्यानगर) असे त्यांची नावे आहेत. पकडण्यात आलेल्या आरोपींच्या ताब्यातून पोलिसांनी काही रोख रक्कम हस्तगत केली आहे. या चोरीतील सोन्या चांदीचे दागिने, आणि इतर महत्त्वाचा मुद्देमाल अद्याप हस्तगत करणे बाकी आहे. या दोन्ही आरोपींना शुक्रवारी (दि. २७) न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता, न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या कोठडी दरम्यान चोरीचा उर्वरित माल कोठे लपवला आहे.

याचा शोध पोलीस घेत आहेत. एकाच रात्री दोन ठिकाणी घरफोड्या झाल्याने शहरात दहशतीचे वातावरण होते. मात्र, गुन्हा दाखल होताच अवघ्या काही तासांत आरोपींना पोलिसांनी जेरबंद केले. याप्रकारणी पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक (सपोनि) विठ्ठल झांजुर्णे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक करत आहे.